Advertisement Advertisement

“रेती माफियांचा एवढा माज ? तहसीलदारांच्या पथकावर टिप्पर घातला; १० दिवस झाले तरी मुख्य आरोपी मोकाटच!” महसूल कर्मचाऱ्यांत संताप; विदर्भ पटवारी संघटनेची आमदार मनोज कायंदेंकडे धाव, “राजकीय दबावाला बळी पडू नका, आरोपींना बेड्या ठोका….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या पथकाच्या अंगावर टिप्पर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेला तब्बल दहा दिवस उलटूनही मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न होऊनही आरोपी मोकाट फिरत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, २८ ऑगस्ट रोजी विदर्भ पटवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार मनोज कायंदे यांची भेट घेत मुख्य आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली. आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास महसूल कर्मचाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही आमदार कायंदे यांनी दिल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

घटनेला दहा दिवस; तरीही मुख्य आरोपी मोकाट

१९ ऑगस्ट रोजी अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी तहसीलदारांचे पथक गेले होते. यावेळी पथकाच्या अंगावर टिप्पर घालून जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर संबंधितांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू झाली असली तरी मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.

मंडळ अधिकारी पंढरी जायभाय, रामदास मानते, प्रशांत वाघ, किशोर खांडेभराड, शिवानंद आंधळे यांच्यासह ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी आमदार मनोज कायंदे यांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी १९ ऑगस्टच्या घटनेची सविस्तर माहिती देत आरोपींच्या अटकेला होत असलेल्या विलंबाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

“शासकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर”

महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत असताना त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पथकावरच जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न होत असेल, तर अशा घटनांमुळे कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते.

त्यामुळे मुख्य आरोपीला तातडीने अटक करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुरेसे पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी विदर्भ पटवारी संघटनेने केली आहे.

आमदार कायंदेंचा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार मनोज कायंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्याशी संपर्क साधला. आरोपींच्या अटकेसाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच प्रकरणाची गंभीरता पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याची भूमिकाही त्यांनी घेतली.

“राजकीय दबावाला बळी पडू नका; आरोपींना बेड्या ठोका”

आमदार मनोज कायंदे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रकरणाची सद्यस्थिती जाणून घेतली. “राजकीय दबावाला बळी न पडता मुख्य आरोपीला तातडीने अटक करा. महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा कर्मचाऱ्यांसोबत आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आता आमदार कायंदे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर पोलिस प्रशासन मुख्य आरोपीला कधी अटक करते, याकडे महसूल विभागासह देऊळगाव राजा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!