Advertisement Advertisement

अपघात अपडेट! चिखली-खामगाव महामार्गावर भीषण अपघात; टिप्पर चालक ठार, बसचालकासह ७ प्रवासी जखमी…..

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली-खामगाव महामार्गावर बोरगाव वसू फाट्याजवळ एसटी बस आणि भरधाव टिप्परची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात टिप्पर चालक सचिन वाघ यांचा जागीच मृत्यू झाला, तर बसचालकासह सात प्रवासी गंभीर जखमी झाले. याशिवाय अन्य आठ ते दहा प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, हातणी येथील बाळू जाधव यांच्या मालकीचा एमएच-२८-एबी-८२२८ क्रमांकाचा टिप्पर सचिन वाघ चालवत होते. ते चिखलीच्या दिशेने रिकामा टिप्पर घेऊन येत असताना बोरगाव वसू फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एसटी बसला त्यांची जोरदार धडक झाली.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर आगाराची एमएच-१४-एमटी-९९३८ क्रमांकाची एसटी बस प्रवाशांना घेऊन अकोल्याकडे जात होती. बसचालक बाळू खेडकर हे देऊळगाव राजा, जालना, चिखली, खामगावमार्गे अकोल्याकडे बस घेऊन निघाले होते. याचवेळी दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.

टिप्परच्या केबिनचा चक्काचूर…

धडक एवढी भीषण होती की, टिप्परच्या केबिनचा अक्षरशः चुराडा झाला. सचिन वाघ हे केबिनमध्ये अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली.

बसचालकासह सात प्रवासी जखमी…

या अपघातात बसचालक बाळू खेडकर यांच्यासह गजानन चैरामजी चरपे (७२), सविता गजानन चरपे (६३, रा. संभाजीनगर), जीवन पंजाबराव वाघ (४१, रा. अनंत नगर, अकोला), सुरेश दुर्गाप्रसाद जोशी (रा. शिर्डी), चाँदबी रमजान बोरीवाले (६५, रा. अकोला) आणि जमिला युनुस मोरीवाले (४७, रा. अकोला) असे प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रक्षाबंधनाच्या प्रवासाला अपघाताचा ब्रेक….

शुक्रवारी रक्षाबंधनाचा सण असल्याने अनेक भाऊ-बहीण एकमेकांना राखी बांधण्यासाठी प्रवास करत होते. मात्र, बोरगाव वसू फाट्याजवळ झालेल्या या भीषण अपघातामुळे त्यांच्या प्रवासात मोठा व्यत्यय आला.

अपघातात मृत्यू झालेल्या सचिन वाघ यांच्या पश्चात पत्नी, चार वर्षांचा मुलगा, तीन महिन्यांची मुलगी, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने संभाजीनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

महामार्गावर दोन-तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा….

अपघातानंतर चिखली-खामगाव महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दोन्ही बाजूंना तब्बल दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. सुमारे दोन ते अडीच तास वाहतूक खोळंबली होती. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

मोठ्या आवाजाने ग्रामस्थ हादरले….

दोन्ही वाहनांची धडक एवढी जोरदार होती की, मोठा आवाज परिसरात घुमला. आवाज ऐकून आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे भीषण दृश्य पाहून ग्रामस्थही हादरले. अन्य वाहनधारक आणि ग्रामस्थांनी जखमींच्या मदतीसाठी तातडीने धाव घेतली.

चिखली-खामगाव महामार्गावरील बोरगाव वसू फाट्यावर झालेल्या या भीषण अपघाताने पुन्हा एकदा भरधाव वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या मार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!