खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील बसस्थानक परिसरातून २४ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खामगाव शहर पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेगाव तालुक्यातील एका गावातील ही तरुणी १६ मार्च रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास आपल्या आई व भावासोबत खामगाव बसस्थानकावर आली होती. गावाकडे जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना तिला तहान लागल्याने ती पाणी पिऊन येते असे सांगून बसस्थानक परिसरात गेली. मात्र त्यानंतर ती परत आली नाही.
दरम्यान, कुटुंबियांनी बसस्थानक परिसरात तसेच नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला, मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या भावाने खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी हरविल्याची नोंद करून पुढील तपास सुरू केला असून, तरुणीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.













