मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतातील विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी जात असलेल्या शेतकरी दाम्पत्याला विहिरीकडे जाण्यास विरोध करून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुरा शिवारात घडली. याप्रकरणी अंढेरा पोलिस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन सुरेश सानप (वय ३२, व्यवसाय शेती, रा. अंढेरा) हे पत्नीसमवेत विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपी विष्णू आसरूबा सानप तेथे आला. त्याने गजानन सानप व त्यांच्या पत्नीला विहिरीवर तसेच शेतात जाण्यास विरोध केला. यावेळी दोघांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, गजानन सानप हे आरोपीला समजावून सांगण्यासाठी गेले असता आरोपीने कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यावर व उजव्या खांद्यावर वार करून जखमी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या पत्नीलाही कुऱ्हाडीच्या दांड्याने आणि चापट-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेनंतर गजानन सानप यांनी अंढेरा पोलिस ठाण्यात तोंडी तक्रार दिली. त्यासोबत वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे पोलिसांनी गुन्हा क्रमांक २९०/२०२६ दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२) आणि ३५२ अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास अंढेरा पोलिस करीत आहेत.












