Advertisement Advertisement

मोठी बातमी..! शेतकरी नेते रविकांत तुपकराचे आंदोलन चिघळले; किनगाव जट्टू येथे एसटी बस पेटवली…

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज) शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला दुसऱ्या दिवशी हिंसक वळण लागल्याचे समोर आले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर किनगाव जट्टू येथे लोणार आगाराची एसटी बस आंदोलकांनी पेटवून दिल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणार आगाराची एसटी बस किनगाव जट्टू येथे मुक्कामी थांबलेली असताना रात्री साडेदहाच्या सुमारास काही आंदोलकांनी बसला आग लावल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, घटनेची माहिती मिळताच पोलीस व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी रविकांत तुपकर यांनी १५ जूनपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरल्याचे दिसून येत आहे. दिवसभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलकांनी सरकारच्या कथित फसव्या कर्जमाफीच्या जीआरच्या प्रती जाळून निषेध व्यक्त केला. काही ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आल्याच्याही घटना समोर आल्या.

अन्नत्याग आंदोलनाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असताना आता एसटी बस जाळण्याची घटना घडल्याने आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलीसांकडून तपास सुरू असून बस पेटविणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!