उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून त्यांच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. बुलढाणा जिल्ह्यासह विविध भागांत शेतकरी आक्रमक झाले असून आज चिखली तालुक्यातील उदयनगर येथे आंदोलकांनी थेट पिण्याच्या पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन सुरू केले.
गेल्या अर्ध्या तासापासून आंदोलक टाकीवर ठिय्या देऊन बसले असून, “रविकांत तुपकर तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, “कर्जमाफी झालीच पाहिजे”, “पीकविमा मिळालाच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.
दरम्यान, १५ जूनपासून बुलढाण्यातील निवासस्थानासमोर रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू असून त्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. काल बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने, रास्तारोको आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. आजही आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे.
किनगाव जट्टू येथे एसटी बस जाळण्याची घटना, खामगाव येथे मध्यरात्री उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न तसेच पेठ पुलावर टायर जाळून आंदोलन करण्यात आल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
मात्र, वाढत्या आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांनी शेतकरी आंदोलकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. “शेतकऱ्यांचा लढा लोकशाही मार्गाने आणि शांततेत सुरू राहावा. कुणीही कायदा हातात घेऊ नये,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तरीही शासनाकडून अद्याप कर्जमाफी व पीकविमा संदर्भात ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून, बुलढाणा जिल्ह्यापासून सुरू झालेला हा लढा आता महाराष्ट्रभर अधिक तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे.













