बुलढाणा (जिमाका – बुलडाणा कव्हरेज न्युज):अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने डिजिटल सेवांकडे आणखी एक मोठे पाऊल टाकत ‘Annasaheb Patil Mahamandal App’ हे मोबाईल अॅप सुरू केले आहे. या अॅपमुळे लाभार्थ्यांना आता विविध योजनांची संपूर्ण प्रक्रिया थेट मोबाईलवरून करता येणार असल्याने सुविधा अधिक सुलभ व पारदर्शक होणार आहेत.
महामंडळाचे www.udyog.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ आधीपासून कार्यरत असून अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली होती. मात्र, यापूर्वी अर्जासाठी संगणक किंवा सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत असल्याने वेळ व खर्च वाढत होता. काही ठिकाणी एजंटमार्फत फसवणुकीच्या घटनाही समोर आल्या होत्या. यावर उपाय म्हणून नागरी सुविधा केंद्र व ‘आपले सरकार’ केंद्रांमार्फत सेवा उपलब्ध करून देण्यात येत होती.
आता नव्याने विकसित करण्यात आलेल्या मोबाईल अॅपमुळे लाभार्थ्यांना अधिक सुरक्षित, सोपी आणि स्वयंपूर्ण सेवा मिळणार आहे. नवीन वापरकर्ते मोबाईल क्रमांक, नाव व ई-मेलद्वारे OTP पडताळणी करून नोंदणी करू शकतात, तर आधीपासून नोंदणीकृत लाभार्थ्यांना लॉगिन आयडी व पासवर्डद्वारे पुढील प्रक्रिया सुरू ठेवता येणार आहे.
महामंडळाच्या योजनांमध्ये LOI, Sanction आणि Claim असे तीन टप्पे असून आवश्यक कागदपत्रे थेट अॅपद्वारे अपलोड करता येणार आहेत. अर्जाची स्थिती तपासणे, अद्ययावत माहिती मिळवणे आणि पुढील कार्यवाही करणे या सर्व सुविधा अॅपमध्ये उपलब्ध आहेत.
तसेच, क्लेम सादर करणाऱ्या आणि नव्याने मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी व्यवसायाचे जिओ-टॅग केलेले छायाचित्र अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या छायाचित्रांची पडताळणी जिल्हा समन्वयकांमार्फत केली जाणार असून, जिओ-टॅगिंग व जिओ-फेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. गूगल नकाशाच्या सहाय्याने प्रत्यक्ष पाहणीही सुलभ होणार आहे.
ही माहिती महामंडळाच्या EHRMS प्रणालीशी जोडली जाणार असून, पुढील टप्प्यात ही सुविधा अॅपमध्येच उपलब्ध होईल. संगणकावरील सर्व सेवा आता मोबाईलवर उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर अॅप डाउनलोड करून या डिजिटल उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.














