बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाने मंगळवारी दुसऱ्या दिवशी अधिक आक्रमक वळण घेतले. बुलढाण्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत शेतकरी रस्त्यावर उतरले असून विविध ठिकाणी आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. दरम्यान, बुलढाण्यात रविकांत तुपकर यांच्या पत्नी अड. शर्वरी तुपकर यांनी केलेल्या ‘भीक मांगो’ आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि कार्यकर्त्यांसह अॅड. शर्वरी तुपकर यांनी बुलढाणा शहरात झोळी घेऊन भीक माग आंदोलन केले. “भीक द्या… भडव्या सरकारसाठी भीक द्या… शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी भीक द्या,” अशा घोषणांनी शहर दणाणून गेले. पादचारी, व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांकडून जमा झालेली रक्कम नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात नेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आली.
यावेळी अॅड. शर्वरी तुपकर म्हणाल्या, “ही भीक घ्या, पण शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करा. उद्योगपतींची लाखो कोटींची कर्जे माफ करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे; मात्र शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पैसा नाही, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.”
“रविभाऊंना काही झाले तर सरकार जबाबदार…
जिल्हाधिकारी कार्यालयात बोलताना अॅड. शर्वरी तुपकर यांनी सरकारला इशाराही दिला. त्या म्हणाल्या, “जोपर्यंत कर्जमाफीवरील अटी-शर्ती रद्द करून सरसकट कर्जमुक्ती जाहीर होत नाही, तोपर्यंत रविभाऊ अन्नाचा एक कणही ग्रहण करणार नाहीत. सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. रविभाऊंच्या तब्येतीला काही झाले, तर त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल. आमचा संताप अनावर झाला तर जिल्हाधिकारी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत एक वीटही शिल्लक राहणार नाही. राज्यातील मंत्री जनतेत फिरू शकणार नाहीत. हा आमचा स्पष्ट इशारा सरकारपर्यंत पोहोचवा.”
दरम्यान, रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असून, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिला आहे.












