Advertisement Advertisement

मेहकरमध्ये डिझेल टँकरचा थरार! भरधाव टँकर थेट हॉटेलमध्ये घुसला! राजमाता जिजाऊ चौकात भीषण अपघात; हॉटेलचे नुकसान, दोन दुचाकींचा चक्काचूर…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर शहरातील गजबजलेल्या राजमाता जिजाऊ चौकात आज सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास डिझेल टँकरचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिझेल घेऊन जाणारा टँकर थेट रस्त्यालगत असलेल्या हॉटेल गणराजमध्ये घुसला. या अपघातात हॉटेलच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून, बाहेर उभ्या असलेल्या दोन दुचाकींचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, डिझेल घेऊन जाणारा टँकर राजमाता जिजाऊ चौकातून जात असताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर टँकर थेट हॉटेल गणराजमध्ये घुसला. टँकरची धडक इतकी जोरदार होती की हॉटेलच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले, तर हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या दोन दुचाकींची मोठी हानी झाली. सकाळची वेळ असल्याने परिसरात नागरिकांची वर्दळ तुलनेने कमी होती. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. प्राथमिक माहितीनुसार, टँकर चालकाने अचानक चक्कर आल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे सांगितल्याचे समजते. मात्र, चालकाला खरोखरच चक्कर आली होती की वाहनात काही तांत्रिक बिघाड झाला होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघाताचे नेमके कारण तपासानंतरच समोर येणार आहे.

गजबजलेल्या चौकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

राजमाता जिजाऊ चौक हा मेहकर शहरातील महत्त्वाचा आणि कायम वर्दळीचा परिसर मानला जातो. अशा ठिकाणी ज्वलनशील डिझेल वाहून नेणारा टँकर थेट हॉटेलमध्ये घुसल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. भरवस्तीतून जाणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!