Advertisement Advertisement

मेहकरमध्ये भरधाव आयशरने दुचाकीस्वार माजी सैनिकाला चिरडले! कास्तकार चौकात काळाचा घाला; माजी सैनिक सिरसाठ यांचा जागीच मृत्यू, गतिरोधकाअभावी अपघातांचा धोका वाढला?

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) मेहकर शहरातील कॉटन मार्केट रोडने सुलतानपूरकडे जाणाऱ्या चौफुली बायपासवरील कास्तकार चौकात भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वडगाव तेजन येथील रहिवासी माजी सैनिक अच्युतराव शिरसाट यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते ७.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी सैनिक अच्युतराव शिरसाट हे आपल्या एमएच २८-एबी-९०७८ क्रमांकाच्या होंडा शाइन दुचाकीने कॉटन मार्केट मार्गे लोणार तालुक्यातील वडगाव तेजन या आपल्या गावी जात होते. याचदरम्यान मेहकर वळण रस्त्यावरील कास्तकार चौकात समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच २६-बीई-१०४४ क्रमांकाच्या आयशर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत शिरसाट यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. एका माजी सैनिकाचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

अपघातानंतर रुग्णवाहिकेला उशीर झाल्याचा आरोप!

अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अपघात होऊन तब्बल एक तास उलटूनही १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसेल, तर गंभीर परिस्थितीतील रुग्णांना वेळेत मदत कशी मिळणार, असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला.

कास्तकार चौकात गतिरोधक कधी बसणार?

कास्तकार चौकात गतिरोधक नसल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भरधाव वाहनांमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता या चौफुलीवर तातडीने गतिरोधक बसवावेत, तसेच वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!