Advertisement Advertisement

“कॅमेऱ्याच्या डोळ्यावर बेशरमाचा हार… अन् रेतीमाफियांवर कारवाईचा अंधार!” “सीसीटीव्ही पाहतोय सगळं… पण कारवाई कोण करणार? “महसूल गेटवर रेतीचा धिंगाणा; संतोष भुतेकर आणि सरपंच सचिन कदमनी कॅमेऱ्यालाच घातला बेशरमाचा हार!”

चिखली(बुलडाणा कव्हरेज न्यूज)मंडपगाव येथील महसूल गेटवर शासनाने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला युवासेना जिल्हाध्यक्ष संतोष भुतेकर व सचिनभाई कदम यांनी गुरुवारी बेशरमाच्या पानाफुलांचा हार घालून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. महसूल गेटखालून सुरू असलेल्या कथित अवैध वाळू वाहतुकीकडे महसूल, पोलीस आणि खनिकर्म विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

. जाहिरात 👆

भुतेकर यांनी सांगितले की, यापूर्वी आंदोलने आणि तक्रारींमुळे काही काळ अवैध रेती वाहतूक बंद झाली होती. मात्र, आता पुन्हा दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या वेळीही मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूची वाहतूक सुरू झाली आहे. शासनाने सार्वजनिक निधीतून बसविलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेतून वाहनांचे क्रमांक व व्हिडिओ पुरावे उपलब्ध होऊ शकतात, तरीही संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

खडकपूर्णा प्रकल्प परिसरात अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटी बिनधास्तपणे सुरू असल्याने प्रकल्पाच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अवैध वाळू वाहतूक स्पष्ट दिसत असतानाही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता व गौण खनिज नियमांनुसार कारवाई होत नसेल, तर ते कर्तव्यातील गंभीर कसूर असल्याचेही भुतेकर म्हणाले.

याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कालावधीतील सीसीटीव्ही फुटेज जप्त करावे, त्याची सखोल तपासणी करावी तसेच अवैध वाळू तस्करांसह निष्काळजी अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. अन्यथा महसूल गेट आणि सीसीटीव्ही यंत्रणा या केवळ दिखाऊ उपाययोजना असल्याचा संदेश जनतेत जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी अनेक दिवसांपासून त्या परिसरात कार्यरत असलेल्या संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या भूमिकेची चौकशी करून त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!