Advertisement Advertisement

मटण दुकानांवरून साखरखेर्ड्यात ‘राडा’! शाळेसमोरचा बाजार हटवण्याच्या कारवाईवरून दोन गट आमनेसामने!

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज): साखरखेर्डा बसस्थानक परिसरातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेसमोर मटण मार्केटची दुकाने थाटण्यावरून दोन गट आमनेसामने आल्याने मंगळवारी, २९ सप्टेंबर रोजी वातावरण चांगलेच तापले. रस्त्याच्या डिव्हायडरवरच काहींनी दुकाने लावून व्यवसाय सुरू केल्याने वाद वाढला. अखेर ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

बसस्थानक परिसरातील शाळेसमोर अनेक मटण व चिकनची दुकाने सुरू असल्याने विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार शाळा समितीच्या सदस्यांनी केली होती. ही दुकाने हटविण्यात यावीत, यासाठी ग्रामपंचायत, पोलीस ठाणे आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहारही करण्यात आला होता. मात्र, काही दुकाने सुरू असतानाच निवडक व्यक्तींचीच दुकाने हटविण्यात येत असल्याचा आरोप करीत संबंधितांनी आक्षेप घेतला.

याच मुद्द्यावरून मंगळवारी काहींनी साखरखेर्डा-लव्हाळा मार्गावरील रस्त्याच्या डिव्हायडरवरच दुकाने थाटून व्यवसाय सुरू केला. ही बाब गावात पसरताच खळबळ उडाली. वातावरण बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन शाळा समितीच्या सदस्यांसह काही नागरिकांनी ठाणेदार युवराज रबडे यांच्याशी संपर्क साधला. प्रकरण ग्रामपंचायत हद्दीतील असल्याने प्रशासनाकडून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, दुपारी सुमारे १ वाजता ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे आणि ठाणेदार युवराज रबडे हे कर्मचाऱ्यांसह वादग्रस्त ठिकाणी पोहोचले. शाळेच्या परिसरात मटण व चिकनची दुकाने लावू नयेत, तसेच सुरू असलेली दुकाने तत्काळ बंद करून पर्यायी व्यवस्था करावी, अशी सक्त ताकीद प्रशासन व पोलिसांनी दिली. यावेळी दोन्ही गटांतील नागरिकांमध्ये शाब्दिक वाद वाढून हाणामारीची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

मोकाट कुत्र्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न….

शाळेसमोर तसेच बसस्थानक आणि रस्त्यालगत मटण मार्केट सुरू असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या परिसरात २०० हून अधिक मोकाट कुत्रे फिरत असल्याचा दावा करण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शाळेसमोरील मटण दुकाने आणि मटण मार्केटबाबत प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे. सध्या वाद शांत झाला असला तरी दोन गटांतील अंतर्गत वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!