Advertisement Advertisement

पेट्रोल पंपावर वळण घेताच काळाचा घाला! मागून आलेल्या दुचाकीची जोरदार धडक; महिलेचा मृत्यू….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पेट्रोल भरण्यासाठी दुचाकी वळवत असतानाच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अनिता अनिल कळसकार (वय ४७, रा. वर्णा) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती अनिल जयराम कळसकार आणि मुलगी संध्या कळसकार जखमी झाले. ही दुर्दैवी घटना १८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजता खामगाव परिसरातील रोहणा गावाजवळील पेट्रोल पंपासमोर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल जयराम कळसकार हे पत्नी अनिता आणि मुलगी संध्या यांच्यासह हिरो होंडा स्प्लेंडर प्लस दुचाकीने (क्रमांक एमएच १२ ईसी ०४७०) वर्णा येथून खामगावकडे जात होते. दरम्यान, रोहणा गावाजवळील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी त्यांनी आपली दुचाकी वळवली. याचवेळी पाठीमागून आलेल्या एमएच २८ सीई ५४२२ क्रमांकाच्या दुचाकी चालकाने भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत अनिता कळसकार यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे पती अनिल कळसकार आणि मुलगी संध्या जखमी झाले. या अपघातात दोन्ही दुचाकींचेही नुकसान झाले. या घटनेमुळे कळसकार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी मनोहर जयराम कळसकार (रा. वर्णा) यांच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी एमएच २८ सीई ५४२२ क्रमांकाच्या दुचाकी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१ आणि ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक इनकर करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!