Advertisement Advertisement

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावानं म्हाताऱ्या मास्तराला घातला लाखोंचा गंडा! फोनवर पोलीस अधिकारी बनून घातली अटकेची भीती! आरटीजीएसनं वेगवेगळ्या खात्यात पैसे पाठवायला लावले!बुलढाण्यात ३२ लाख ९० हजार ४०० रुपयांचा सायबर घोटाळा!

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावानं म्हाताऱ्या मास्तराला घातला लाखोंचा गंडा! फोनवर पोलीस अधिकारी बनून घातली अटकेची भीती! आरटीजीएसनं वेगवेगळ्या खात्यात पैसे पाठवायला लावले!बुलढाण्यात ३२ लाख ९० हजार ४०० रुपयांचा सायबर घोटाळा!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ३ सप्टेंबर रोजी विविध स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये सायबर फसवणूक, अवैध वाळू वाहतूक, दुचाकी चोरी, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, अवैध दारू विक्री, आर्थिक फसवणूक, मारहाण तसेच बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारीचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सायबर फसवणुकीच्या एका प्रकरणात सेवानिवृत्त मुख्याध्यापकाला तब्बल ३२ लाख ९० हजार ४०० रुपयांचा गंडा घालण्यात आला.

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सेवानिवृत्त मुख्याध्यापकाला ३२.९० लाखांचा गंडा….

बुलढाणा येथील सायबर पोलीस ठाण्यात शेलूद येथील ७० वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रल्हाद चिंतामण पवार यांच्या फसवणुकीप्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. अज्ञात आरोपींनी पवार यांना व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करून आपण मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवले.

तुमच्या बँक खात्यात संशयास्पद व्यवहार झाले असून मनी लाँड्रिंग तसेच बनावट बँक खाते उघडण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल असल्याचे सांगून आरोपींनी त्यांना अटक करण्याची भीती दाखवली. त्यानंतर ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये आरटीजीएसद्वारे पैसे पाठविण्यास भाग पाडले. अशाप्रकारे आरोपींनी ३२ लाख ९० हजार ४०० रुपये हडप केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन कांबळे करीत आहेत.

विना नंबर ट्रॅक्टरमधून वाळूची चोरटी वाहतूक; ८.१० लाखांचा मुद्देमाल जप्त….

मलकापूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अग्रवाल पॅकर्ससमोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर विना नंबर ट्रॅक्टरमधून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने ट्रॅक्टर न थांबविता वाळू रस्त्यावर खाली केली आणि तेथून पळ काढला.

या कारवाईत सुमारे ८ लाख रुपये किमतीचा विना नंबर निळ्या रंगाचा ट्रॅक्टर आणि १० हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू, असा एकूण ८ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात अजय पाटील (रा. सालबर्डी, मुक्ताईनगर) आणि स्वप्नील कैलास जुमळे (वय २६, रा. अहिल्यादेवी नगर, मुक्ताईनगर) यांची नावे समोर आली आहेत.

मलकापूरमध्ये दुचाकी चोरी….

मलकापूर शहरातील साई अपार्टमेंट परिसरातून अज्ञात चोरट्याने ड्रीम युगा कंपनीची काळ्या रंगाची दुचाकी चोरून नेल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. सदर दुचाकीची अंदाजे किंमत ३० हजार रुपये आहे. २५ ऑगस्टच्या रात्रीपासून २६ ऑगस्टच्या सकाळदरम्यान ही चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या दोघांवर कारवाई….

मलकापूर शहर पोलिसांनी तहसील चौक परिसरात मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या दोन वाहनचालकांवर कारवाई केली. गणेश नामदेव झनंके हा मोटारसायकल वेडीवाकडी व अनियंत्रितपणे चालविताना आढळून आला. वैद्यकीय तपासणीत त्याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले.

दुसऱ्या प्रकरणात इसुफ खान दिलावर खान हा प्लेझर स्कुटी अनियंत्रितपणे चालविताना आढळला. वैद्यकीय तपासणीत तोही मद्याच्या अमलाखाली असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही प्रकरणांत मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिरपूरमध्ये देशी दारूसह एकावर गुन्हा….

रायपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरपूर शिवारात पोलिसांनी कारवाई करून देशी दारूच्या १८० मिलीच्या सहा सीलबंद बाटल्या जप्त केल्या. जप्त मुद्देमालाची किंमत ६०० रुपये आहे. या प्रकरणी नंदकिशोर विठ्ठल लेंभे (वय ३८, रा. शिरपूर) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रॅक्टरच्या व्यवहारातून फसवणुकीचा आरोप….

नांदुरा पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरच्या व्यवहारातून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीला ट्रॅक्टर घेतल्यानंतर कामे मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनावरून त्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यास प्रवृत्त करण्यात आले.

त्यानंतर संबंधित ट्रॅक्टर आरोपीच्या जागेवर उभा करून फिर्यादीला कोणतीही कल्पना न देता तो अन्य व्यक्तीला विकल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

फवारणीच्या कारणावरून शेतात मारहाण….

मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुलमखेड येथे शेतातील औषध फवारणीच्या कारणावरून वाद झाला. फवारणीमुळे मुलगा व वडिलांना उलट्या होत असल्याचे सांगितल्यानंतर वाद वाढला.

यावेळी आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून काठीने डोक्यात मारहाण केली. तसेच चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दोन वेगवेगळ्या घटनांत विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू….

धाड आणि मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू झाल्याच्या दोन स्वतंत्र घटनांची नोंद झाली आहे. जामठी येथील शरद नारायण तायडे (वय ३९) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर वडजी येथील सुनील शरदचंद्र बोंडे (वय ४१) हे घराच्या दरवाजात मृतावस्थेत आढळून आले.

दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

मलकापूरमधील २४ वर्षीय तरुण बेपत्ता…

मलकापूर शहरातील राजमोहल्ला, पारपेठ येथील शोयेब खान भिकन खान (वय २४) हा १ सप्टेंबर रोजी घरातून कोणालाही न सांगता निघून गेला. नातेवाईक तसेच परिसरात शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे ३ सप्टेंबर रोजी मलकापूर शहर पोलिसांत मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

नागरिकांनी सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन….

दरम्यान, वाढत्या ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकारांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. कोणत्याही व्यक्तीने फोन किंवा व्हिडिओ कॉलवरून पोलीस अधिकारी, सीबीआय, क्राईम ब्रँच किंवा अन्य सरकारी अधिकारी असल्याचे सांगून अटक अथवा चौकशीची भीती दाखवली आणि पैसे मागितले, तर घाबरून पैसे पाठवू नयेत. अशा प्रकारची संशयास्पद मागणी झाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!