मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): थकीत मजुरीचे ७ हजार रुपये मागण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय तरुणाला तिघांनी शिवीगाळ करत लोखंडी पाइप व चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मलकापूर शहरातील चारखंबा चौक परिसरात घडली. या मारहाणीत तरुणाच्या गुडघ्यासह छातीला दुखापत झाली असून, त्याच्यावर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद अबुझर मोहम्मद अक्रम (वय २४) हे मजुरीचे काम करतात. त्यांच्या मजुरीचे ७ हजार रुपये थकीत होते. ही रक्कम मागण्यासाठी ते १९ ऑगस्ट रोजी मोहम्मद शाहरुख याच्याकडे गेले होते. यावेळी थकीत पैशांच्या मागणीवरून शाहरुख याने अबुझर यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली तसेच धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर मोहम्मद अकील व मोहम्मद रइस हे दोघेही तेथे आले. तिघांनी मिळून अबुझर यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. याचवेळी मोहम्मद शाहरुख याने लोखंडी पाइपने अबुझर यांच्या उजव्या गुडघ्यावर व छातीवर प्रहार केल्याचा आरोप आहे.
अबुझर यांना मारहाण होत असल्याचे पाहून त्यांची आई भांडण सोडवण्यासाठी धावून आली. मात्र, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मारहाणीत गंभीर दुखापत झाल्यानंतर अबुझर यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या घटनेप्रकरणी अबुझर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी मोहम्मद शाहरुख, मोहम्मद अकील आणि मोहम्मद रइस या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निंबोळकर करीत आहेत.













