Advertisement Advertisement

दारूच्या नशेत महिलेच्या घरात घुसून गोंधळ; पतीला रॉडने मारण्याची धमकी, शेगावात गुन्हा.. …

शेगाव : (बुलडाणा कव्हरेज न्युज) माळीपुरा परिसरात दारूच्या नशेत एका महिलेच्या घरात घुसून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आणि तिच्या पतीला लोखंडी रॉडने मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार १३ ऑगस्ट रोजी रात्री घडला. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी विश्वजित सारंगधर लांबे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळीपुरा परिसरातील २३ वर्षीय महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, आरोपी विश्वजित लांबे हा दारूच्या नशेत कपडे काढून केवळ चड्डीवर फिर्यादीच्या घरात आला. त्याने महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरड केली. आवाज ऐकून शेजारील नागरिक घटनास्थळी आले आणि त्यांनी आरोपीला आवरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला.

काही वेळाने महिलेचे पती घरी आले. दोघेही पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाण्याच्या तयारीत असतानाच आरोपी पुन्हा हातात लोखंडी रॉड घेऊन त्यांच्या घरी आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यावेळी महिलेची आई आणि भाऊ यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर आरोपीने महिला, तिचा पती, आई आणि भाऊ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. आरोपी दारूच्या व्यसनाच्या आहारी असून किरकोळ कारणांवरून वारंवार वाद घालत असल्याने आपल्या कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७९, ३३३, ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भामोदकर करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!