Advertisement Advertisement

उत्तराखंडमध्ये कर्तव्य बजावताना चिखलीच्या जवानाचा मृत्यू; हवालदार हरिदास कापसे यांना वीरमरण! ३६ वर्षीय जवानाच्या निधनाने शेलसूरसह चिखली तालुक्यावर शोककळा; मुलीच्या वाढदिवशीच हरपले पितृछत्र…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : उत्तराखंडमधील अतिउंचावरील (हाय अल्टीट्यूड) भागात कर्तव्य बजावत असताना प्रकृती अचानक खालावल्याने चिखली तालुक्यातील शेलसूर येथील जवान हवालदार हरिदास मधुकर कापसे (वय ३६) यांना प्राण गमवावे लागले. मूळ बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप युनिटचे आणि सध्या ४११ (स्वतंत्र) पॅरा फिल्ड कंपनी, आग्रा येथे सेवेत असलेले कापसे हे उत्तराखंडमध्ये लापथल पोस्ट परिसरात कर्तव्य बजावत होते.

७ ऑगस्ट रोजी कर्तव्यावर असताना सायंकाळी सुमारे ५ वाजता त्यांना अचानक उलटी झाली. त्यानंतर ते वैद्यकीय तपासणी कक्षात गेले. प्राथमिक तपासणी व उपचारानंतर त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यावेळी त्यांच्या जीवनावश्यक बाबी सामान्य असल्याचे आढळून आल्याची माहिती आहे.

यानंतर प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना वैद्यकीय कक्षातून सोडण्यात आले. मात्र, सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुन्हा ड्युटीवर जात असताना त्यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने वैद्यकीय कक्षात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू करून त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचारादरम्यान रात्री ८.२६ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

अतिउंचावरील भागातील कमी प्राणवायूच्या परिस्थितीत त्यांना हृदयविकाराचा त्रास झाल्याचे प्राथमिक कारण सांगण्यात येत आहे.

शोकाकुल कुटुंबीयांना धक्का….

हवालदार हरिदास कापसे यांच्या निधनाची माहिती ८ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. ही बातमी समजताच शेलसूर, चिखलीसह परिसरात शोककळा पसरली.

विशेष म्हणजे, अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच हरिदास कापसे यांच्या मातोश्रींचे निधन झाले होते. त्या दुःखातून कुटुंब सावरत असतानाच जवान पुत्राच्या निधनाची दुर्दैवी बातमी आल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

मुलीच्या वाढदिवशीच हरपले पितृछत्र….

हवालदार हरिदास कापसे यांच्या निधनातील सर्वाधिक हृदयस्पर्शी बाब म्हणजे, ज्या दिवशी त्यांनी कर्तव्य बजावताना अखेरचा श्वास घेतला, त्याच दिवशी त्यांच्या चिमुकल्या मुलीचा वाढदिवस होता.

एका बाजूला मुलीच्या वाढदिवसाचा आनंद साजरा होण्याची वेळ असताना दुसऱ्याच बाजूला वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी कुटुंबीयांवर कोसळली. नियतीच्या या दुर्दैवी प्रसंगाने कुटुंबीयांसह संपूर्ण परिसर हळहळला आहे.

पार्थिव चिखलीत आणले जाणार…

हवालदार हरिदास कापसे यांचे पार्थिव उत्तराखंडहून दिल्लीमार्गे महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचल्यानंतर लष्करी मानवंदना देऊन पार्थिव बायरोड चिखली येथे आणण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!