चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): आमदार श्वेता महाले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील हातणी व वळती येथे प्रस्तावित ‘छत्रपती शिवाजी महाराज हेरिटेज थीम पार्क (शिवसृष्टी)’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आता गती मिळण्याची चिन्हे आहेत. सुमारे ६५ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) येत्या १५ दिवसांत तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत देण्यात आले.
शुक्रवारी, दि. ७ ऑगस्ट रोजी मंत्रालयात या प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक झाली. या बैठकीत प्रस्तावित शिवसृष्टी प्रकल्पाच्या नियोजनासह विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. आमदार श्वेता महाले यांनी यापूर्वी पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेऊन प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्यासह संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पाचा डीपीआर तयार करून तो शासनाकडे सादर करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
अशी असेल चिखलीची ‘शिवसृष्टी’!
प्रस्तावित शिवसृष्टी प्रकल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यटकांसमोर उलगडण्यात येणार आहे.
या प्रकल्पात भव्य व आकर्षक प्रवेशद्वार, प्रशासकीय इमारत, अत्याधुनिक सभागृहे, परिषद केंद्र, मोठा बँक्वेट हॉल, एमटीडीसीचे सुसज्ज रिसॉर्ट, शिवकालीन इतिहासाचे संग्रहालय, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे दालन, ३६० अंश डोम शो, खुल्या आकाशाखालील भव्य रंगमंच, फूड कोर्ट, क्राफ्ट बाजार, मुलांसाठी मनोरंजन क्षेत्र तसेच निसर्गरम्य पायवाटा यांसह कुटुंबांसाठी विविध सुविधा उभारण्याचा प्रस्ताव आहे.
आधुनिक तंत्रज्ञान आणि दृकश्राव्य माध्यमांचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास पर्यटकांना अनुभवता यावा, अशी या प्रकल्पामागील संकल्पना आहे.
पर्यटनासह स्थानिक व्यवसायांनाही मिळणार मोठी चालना….
शिवसृष्टी प्रकल्प साकारल्यास चिखलीची ओळख ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन केंद्र म्हणून अधिक बळकट होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे चिखली व परिसरातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्याबरोबरच हॉटेल व्यवसाय, वाहतूक, हस्तकला, खाद्यपदार्थ, स्थानिक उद्योग आणि इतर पूरक व्यवसायांच्या संधी वाढण्याची शक्यता आहे.
पर्यटकांची संख्या वाढल्यास स्थानिक नागरिकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चार प्रमुख पर्यटनस्थळांच्या मध्यवर्ती ठिकाणी चिखली….
चिखलीचे भौगोलिक स्थान या प्रकल्पासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. चिखली हे अजिंठा लेणी, लोणार सरोवर, सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ आणि शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर या प्रमुख पर्यटनस्थळांच्या मध्यवर्ती भागात येते.
त्यामुळे चिखली येथे शिवसृष्टी साकारल्यास विदर्भासह महाराष्ट्रातील विविध भागांतून येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्याची मोठी क्षमता या प्रकल्पात आहे.
१५ दिवसांत डीपीआर; आता प्रत्यक्ष कामाकडे लक्ष….
सुमारे ६५ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा डीपीआर येत्या १५ दिवसांत शासनाकडे सादर करण्याचे निर्देश मिळाल्याने चिखलीच्या शिवसृष्टी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. आता डीपीआरनंतर शासनाकडून पुढील प्रशासकीय व आर्थिक मंजुरी मिळून प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात कधी होते, याकडे चिखलीकरांचे लक्ष लागले आहे.















