मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दिवाणी न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यात स्थावर मालमत्ता जप्तीचे वॉरंट न बजावता ते परत करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मेहकर येथील दिवाणी न्यायालयाचा बेलीफ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात रंगेहाथ अडकला. जगदीश सुखदेव राऊत (वय ३१, रा. माळीपुरा, सिंदखेड राजा) असे ताब्यात घेतलेल्या बेलीफचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी, ६ ऑगस्ट रोजी मेहकर बसस्थानक परिसरात करण्यात आली.
सुरुवातीला मागितली १५ हजारांची लाच….
मिळालेल्या माहितीनुसार, एका ५३ वर्षीय शेतकरी तथा तक्रारदाराविरुद्ध मेहकर येथील दिवाणी न्यायालयात दावा सुरू होता. या प्रकरणात स्थावर मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावण्यात येणार होते. हे वॉरंट न बजावता परत करण्यासाठी बेलीफ जगदीश राऊत याने तक्रारदाराकडे सुरुवातीला १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने याबाबत बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तडजोडीनंतर १० हजारांवर व्यवहार ठरला….
तक्रारीची ACB पथकाने ६ ऑगस्ट रोजी पडताळणी केली. यावेळी तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारण्यास बेलीफ राऊत तयार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ACBच्या पथकाने मेहकर बसस्थानक परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताच ACBच्या पथकाने जगदीश राऊत याला रंगेहाथ ताब्यात घेतले.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू…
या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश पवार तसेच पोलीस अंमलदार शैलेश सोनवणे, पंढरी शेळके आणि नितीन शेटे यांच्या पथकाने केली.















