Advertisement Advertisement

मेहकरच्या अभ्यासिकेची फी वाढली; पोरं थेट नगरपालिकेत जाऊन बसली! दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांचा आंदोलनात्मक पवित्रा; शुल्क कमी करण्याची मागणी, माजी आमदार संजय रायमूलकरांनी घेतली विद्यार्थ्यांची बाजू….

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) :दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनातून ‘जेन झी’ युवकांची ताकद देशाला दिसून आली. त्याच धर्तीवर आता मेहकर शहरातील युवकांनी नगरपालिका अभ्यासिकेच्या शुल्कवाढीविरोधात आवाज उठविला आहे. अभ्यासिकेचे वाढविलेले शुल्क तातडीने कमी करावे, तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी मेहकर नगरपालिकेत ठिय्या आंदोलन केले.

मेहकर शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून विदर्भातील पहिली अभ्यासिका उभारण्यात आली आहे. या अभ्यासिकेत सुमारे दोनशे विद्यार्थी अभ्यास करू शकतात. दोन महिन्यांपूर्वी सर्वसाधारण आणि व्हीआयपी अशा दोन केबिनचे लोकार्पण करण्यात आले. सुरुवातीला सर्वसाधारण केबिनसाठी दरमहा ३०० रुपये, तर व्हीआयपी केबिनसाठी ५०० रुपये शुल्क आकारले जात होते.

मात्र, अभ्यासिकेत विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार युवकांनी केली आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, मोबाईल अथवा लॅपटॉप चार्ज करण्यासाठी प्लगची व्यवस्था नाही, अशा अनेक अडचणी असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

पूर्वसूचना न देता शुल्कवाढ केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप…

१ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे अभ्यासिकेतील असुविधांबाबत तक्रार मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या दिवशी नगरपालिका कार्यालयाला सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांना आपले म्हणणे मांडता आले नाही. त्यानंतर सोमवार, ३ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी नगरपालिकेला रीतसर निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली.

दरम्यान, कोणतीही पूर्वसूचना न देता अभ्यासिकेच्या शुल्कात वाढ करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सर्वसाधारण केबिनचे शुल्क ३०० रुपयांवरून थेट ५०० रुपये, तर व्हीआयपी केबिनचे शुल्क ५०० रुपयांवरून ७०० रुपये करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप निर्माण झाला.

विद्यार्थ्यांचा नगरपालिकेत ठिय्या….

शुल्कवाढीच्या निषेधार्थ दोनशेहून अधिक विद्यार्थी ५ ऑगस्ट रोजी मेहकर नगरपालिकेत दाखल झाले. वाढविलेले शुल्क तातडीने कमी करावे, तसेच अभ्यासिकेत मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

मात्र, मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी शुल्कवाढ कायम राहणार असल्याची भूमिका घेतल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप आणखी वाढला. शुल्क कमी न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा युवकांनी दिला.

संजय रायमूलकरांनी घेतली विद्यार्थ्यांची बाजू….

नगरपालिका प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी माजी आमदार संजय रायमूलकर यांच्याकडे धाव घेतली. रायमूलकर यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेत मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्याशी चर्चा केली.

यावेळी रायमूलकर यांनी आपण विद्यार्थ्यांच्या बाजूने असल्याचे सांगितले. अभ्यासिका सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न केले असून, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे आहे. होतकरू आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना परवडेल अशा पद्धतीने शुल्क निश्चित करण्याबाबत नगरपालिका प्रशासनाने विचार करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘खासगी अभ्यासिकेपेक्षा जास्त शुल्क कशासाठी?’

विद्यार्थ्यांनी नगरपालिका प्रशासनाच्या शुल्कवाढीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. खासगी अभ्यासिकांमध्ये आकारण्यात येणाऱ्या शुल्काइतके किंवा त्यापेक्षा जास्त शुल्क नगरपालिका अभ्यासिकेसाठी घेत असेल, तर शासकीय अभ्यासिकेचा विद्यार्थ्यांना फायदा काय? असा सवाल युवकांनी उपस्थित केला.

अभ्यासिकेचे शुल्क कमी करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा आणि पिण्याचे पाणी, चार्जिंग पॉइंटसह आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

‘मागे हटणार नाही’; आंदोलनाचा इशारा…

शुल्कवाढ मागे घेतली नाही, तर आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. त्यामुळे मेहकर नगरपालिका अभ्यासिकेच्या शुल्कवाढीचा प्रश्न आता चांगलाच पेटण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर नगरपालिका प्रशासन काय निर्णय घेते, याकडे मेहकरकरांचे लक्ष लागले आहे

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!