Advertisement Advertisement

जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर; शेगाव, जळगाव जामोद, नांदुरा व संग्रामपूरमध्ये मिळून ४ जणांचा मृत्यू! २४ जनावरे दगावली….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने विशेषतः घाटाखालच्या भागात मोठा कहर केला आहे. सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, शेगाव, जळगाव जामोद, नांदुरा आणि संग्रामपूर तालुक्यांमध्ये जीवित व वित्तहानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २४ जनावरेही दगावल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.

जिल्ह्यातील ९२ महसूल मंडळांपैकी तब्बल ९१ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे धरणे, नद्या व नाले तुडुंब भरले असून खरीप पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला असला, तरी घाटाखालच्या भागात मोठे नुकसान झाले आहे.

चार जणांचा मृत्यू…

३० जुलै रोजी शेगाव शहरात मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून सरूबाई पल्हाडे या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर जळगाव जामोद तालुक्यातील ईसापूर परिसरात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह त्याच दिवशी सापडला.

दरम्यान, नांदुरा आणि संग्रामपूर तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोघांचा शोध युद्धपातळीवर सुरू होता. अखेर १ ऑगस्ट रोजी दोघांचेही मृतदेह शोध पथकांना आढळून आले. त्यामुळे अतिवृष्टीतील मृतांचा आकडा चारवर पोहोचला आहे.

२४ जनावरे दगावली…

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यात २४ जनावरांचा मृत्यू झाला असून अनेक ठिकाणी शेती, घरे, रस्ते आणि वीजपुरवठ्याचेही मोठे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासन पंचनामे करण्याचे काम वेगाने करत असून बाधितांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

प्रशासन सतर्क…

पूरग्रस्त भागात महसूल, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या पथकांकडून मदतकार्य सुरू आहे. नागरिकांनी नदी-नाले ओलांडू नयेत तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!