“जळगाव जामोदमध्ये “महाप्रलय”; २५५ मिमी पावसाने शेती वाहून गेली; घरांमध्ये पाणी घुसले! सरकारने आठवडाभरात मदत द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; रविकांत तुपकरांचा थेट इशारा”
बुलडाणा (प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यावर निसर्गाने अक्षरशः कहर केला आहे. अवघ्या एका रात्रीत जळगाव जामोद तालुक्यात तब्बल २५५ मिमी पावसाची नोंद झाल्याने संपूर्ण परिसरात हाहाकार उडाला आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत, अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून शेती, घरे आणि जनजीवनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तातडीने पंचनामे करून आठवडाभराच्या आत शंभर टक्के नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही तुपकर दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर सुरू मुसळधार पावसाने अनेक भागांत नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक तडाखा जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांना बसला आहे. रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये घरांमध्ये पाणी घुसले असून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला असून इंटरनेट सेवा बंद पडल्याने काही गावांचा संपर्कही तुटला आहे. पुरामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
पूराच्या प्रचंड लोंढ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये उभी असलेली पिके अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत. नुकतीच उगवू लागलेली पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये गाळ साचला असून काही ठिकाणी सुपीक जमीनच खरडून गेली आहे. शेतांचे रूपांतर नदी आणि धरणांमध्ये झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.
या भीषण परिस्थितीची दखल घेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. पूरग्रस्त नागरिकांसाठी अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी, शेती व घरांच्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करण्यात यावेत आणि आठवडाभराच्या आत शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. “शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडलेला असताना या महापुराने त्याच्या उरल्यासुरल्या आशाही वाहून नेल्या आहेत. सरकारने केवळ पाहणी दौरे करून वेळ घालवू नये.
तातडीने मदतीचे निर्णय घ्यावेत. आठवडाभरात मदत न मिळाल्यास पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,” असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.













