Advertisement Advertisement

कर्जमाफीच्या यादीतील तफावतीवरून शेतकरी आक्रमक; २ लाखांपर्यंतचे संपूर्ण कर्ज व्याजासह विनाअट माफ करा!विनायक सरनाईक यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी…

चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या पहिल्याच यादीत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक त्रुटी आणि विसंगती आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्जमाफीची यादी, केवायसी (KYC) पावती आणि संबंधित बँकांच्या नोंदींमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप करत क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कार्यकारी परिषद सदस्य विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), बुलढाणा यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
निवेदनानुसार, अनेक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष घेतलेल्या कर्जाच्या तुलनेत कर्जमाफीच्या यादीत अत्यल्प रक्कम दाखविण्यात आली आहे. शासनाची यादी, केवायसी पावती आणि बँकेची आकडेवारी यामध्ये सुसंगती नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे केवायसी करावी की पोर्टलवर तक्रार दाखल करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. अनेकांच्या नावांचा यादीत समावेश असूनही कर्जाची रक्कम अपुरी दाखविण्यात आली असल्याची तक्रार आहे.
विशेष म्हणजे, दोन लाख रुपयांच्या आत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही संबंधित बँकांकडून अतिरिक्त व्याज भरण्याचा सल्ला दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळूनही शेतकऱ्यांवर आर्थिक भार कायम राहत असल्याची भावना व्यक्त होत आहे. काही प्रकरणांमध्ये केवायसी पूर्ण करूनही शेतकऱ्यांची नावे यादीत नसल्याचे प्रकारही समोर आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विनायक सरनाईक यांनी शासनाच्या अंमलबजावणीवर टीका करत, “कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क असून तो उपकार नाही. तांत्रिक त्रुटींमुळे पात्र शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये,” अशी भूमिका मांडली.
प्रमुख मागण्या
कर्जमाफीची यादी, केवायसी पावती आणि बँकांच्या नोंदीतील तफावत तातडीने तपासून दुरुस्त करावी.
पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे संपूर्ण कर्ज (मुद्दल व व्याजासह) विनाअट माफ करावे.
कर्जमाफीच्या रकमेतील फरकाबाबत संबंधित बँकांनी लेखी खुलासा द्यावा.
दोन लाख रुपयांखालील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांकडून अतिरिक्त व्याजाची वसुली करू नये.
कर्जमाफी प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना स्पष्ट आणि अधिकृत माहिती उपलब्ध करून द्यावी.
सरनाईक यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, केवायसी करण्यापूर्वी संबंधित बँकेतून आपल्या कर्जाचे मुद्दल आणि व्याजाची रक्कम तपासावी. शासनाच्या यादीतील आकडे आणि बँकेची माहिती जुळत असल्यासच केवायसी करावी. तफावत आढळल्यास केवायसी करताना ‘तक्रार’ हा पर्याय निवडून पोर्टलवर नोंद करावी, जेणेकरून संबंधित प्रकरण तक्रार निवारण समितीकडे जाईल.
दरम्यान, मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास शेतकऱ्यांसह संबंधित बँका, सहायक निबंधक तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विनायक सरनाईक, नितीन राजपूत आणि क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!