Advertisement Advertisement

कांदा बियाण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक?; गुन्हे दाखल न झाल्यास क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यात बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढत असतानाच चिखली तालुक्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रणव सीड्स (जालना) आणि संजय सीड्समार्फत हिवाळी हंगामासाठी कांदा बियाणे खरेदी करण्यात आले. मात्र, ठरल्याप्रमाणे मोबदला न देता बियाण्याला उगवणक्षमता (जर्मिनेशन) नसल्याचा दावा करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नितीन राजपूत आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी सदस्य विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली गुंज, सवडद, आमखेड व परिसरातील बाधित शेतकरी आक्रमक झाले आहेत. संबंधित कंपन्यांविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांच्या घामाच्या कमाईचा मोबदला त्वरित अदा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

कंपनीच्या प्रतिनिधींनी गावात येऊन प्रति शेतकरी सुमारे ५० हजार रुपयांचा मोबदला देण्याचे आश्वासन देत करार केला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी विश्वासाने कांदा बियाण्याची पोती वाहनाद्वारे कंपनीकडे पाठवली. मात्र, सर्व पोती एकत्र वाहतूक केल्यामुळे कोणते बियाणे कोणत्या शेतकऱ्याचे हे ओळखणे अशक्य झाले आहे.

तक्रारीनुसार, सुरुवातीला संबंधित प्रतिनिधींनी “दोन दिवसांत प्रयोगशाळेत उगवणक्षमता तपासून अहवाल देतो,” असे आश्वासन दिले होते. मात्र, तब्बल दोन महिन्यांनंतर बियाणे निकृष्ट असल्याचा दावा करत मोबदला देण्यास नकार दिला जात असून, शेतकऱ्यांना धमकावले जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच बाधित शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा मोबदला तातडीने मिळावा, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!