मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शहरातील गणेश नगर परिसरातील ३७ वर्षीय महिला स्वामी समर्थ यांच्या बैठकीला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र, त्यानंतर ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली. तरीही तिचा ठावठिकाणा न लागल्याने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अशोक तुकाराम काळे (वय ७१, रा. गणेश नगर, मलकापूर) यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्यांची मुलगी रुपाली अशोक काळे (वय ३७) ही २८ जुलै रोजी सकाळी सुमारे ७.४५ वाजता आनंद सोसायटी परिसरात आयोजित स्वामी समर्थ बैठकीसाठी जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली होती.
सायंकाळपर्यंत ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांकडे तिचा शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून मिसिंग क्रमांक ५३/२०२६ नोंदविण्यात आला आहे.
बेपत्ता रुपाली काळे यांचा रंग गोरा, उंची सुमारे ५ फूट ४ इंच, केस काळे असून त्या घरातून निघताना अंगात लाल रंगाचा पंजाबी ड्रेस, काळ्या रंगाची सलवार, गळ्यात काळ्या रंगाचा रुमाल आणि पायात साधे बूट परिधान केले होते.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल शेळे करीत आहेत. संबंधित महिलेबाबत कोणालाही कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने मलकापूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.













