Advertisement Advertisement

चांडोळ यात्रेत खंजिर घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक; मद्यधुंद अवस्थेत भाविकांमध्ये घातली दहशत…

चांडोळ (बुलढाणा कव्हरेज न्युज): चांडोळ येथील यात्रेदरम्यान हातात धारदार खंजिर घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरत भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाला धाड पोलिसांनी तत्पर कारवाई करत अटक केली. या घटनेमुळे यात्रास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दीपक ऊर्फ दत्तात्रय उमेश चिंचोले (वय २२, रा. धाड) असे आहे. २५ जुलै रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास चांडोळ येथील सार्वजनिक यात्रेत तो हातात धारदार खंजिर घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपीच्या या कृत्यामुळे यात्रेला आलेल्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची परिस्थिती निर्माण झाली.

यावेळी यात्रेत बंदोबस्तावर तैनात असलेल्या धाड पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून आरोपीला शस्त्रासह ताब्यात घेतले. त्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत आरोपीने मद्यसेवन केल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम, १९५९ अंतर्गत कलम ४ व २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम १३५(१) तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र हजारे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!