मोताळा (बुलढाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील इब्राहिमपूर येथे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ५५ वर्षीय इसमाचा मृतदेह शनिवारी सकाळी शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
मृत व्यक्तीचे नाव गोपाल गंगाराम गायकवाड (वय ५५, रा. इब्राहिमपूर, ता. मोताळा) असे आहे. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, गोपाल गायकवाड हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांना मद्यपानाचे व्यसन असून त्यांची मानसिक स्थितीही काहीशी अस्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
रविवार, २६ जुलै रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा रोहीदास गायकवाड हा कोथळी शिवारातील गट क्रमांक १५ मधील शेतात गेला असता विहिरीत वडिलांचा मृतदेह तरंगताना त्याच्या निदर्शनास आला. त्याने तत्काळ गावकऱ्यांना व पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत चिटवार करीत आहेत.














