मेहकर (बुलढाणा कव्हरेज न्यूज): मेहकर शहरात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाल्याच्या अवैध साठ्यावर अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि मेहकर पोलिसांनी संयुक्त धडक कारवाई करत ५८ हजार ५४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी युनुसोद्दीन शब्बीरोद्दीन (वय ६२) याला अटक करण्यात आली असून, या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या अमरावती विभागाला १४ जुलै रोजी मेहकर शहरातील छोटा इमामवाडा परिसरातील एका घरात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाल्याचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे विशेष दक्षता पथकाने मेहकर पोलिसांच्या मदतीने संबंधित ठिकाणी छापा टाकला.
छाप्यात घरातून ५८,५४४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाला जप्त करण्यात आला. कारवाईनंतर अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग किर्ता वसावे (वय ५२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहकर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३, २७४, २७५, १२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम ५९ आणि २६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील, स. द. केदारे (अमरावती विभाग) आणि मेहकर पोलीस ठाण्याचे ठाणेदार व्यंकटेश आलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी संदीप सूर्यवंशी (दक्षता), विजय घोंगे, अनुराग चव्हाण यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांचन जारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप राठोड व इतर पोलीस कर्मचारी करीत आहेत.












