Advertisement Advertisement

शेतात झोपलेल्या शेतकऱ्यावर लोखंडी पाइपने जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): नांदुरा तालुक्यातील दिघी येथे शेतातील पिकाची रखवाली करत असताना झोपलेल्या शेतकऱ्यावर लोखंडी पाइपने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (७ जुलै) पहाटे घडली. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल शालिग्राम हिवराळे (वय ५०, रा. दिघी) हे नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतात पिकाच्या रखवालीसाठी झोपले होते. मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास श्रीकृष्ण जानकीराम हिवराळे, संघपाल सारीपुत्र हिवराळे, शांताराम काशीराम हिवराळे आणि बाळू काशीराम हिवराळे (सर्व रा. दिघी) हे तेथे आले. पूर्ववैमनस्यातून चौघांनी संगनमत करून अनिल हिवराळे यांना पकडून ठेवले.

यानंतर श्रीकृष्ण हिवराळे याने लोखंडी पाइपने अनिल हिवराळे यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती वडनेर भोलजी दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी अजय सुरळकर यांनी दिल्यानंतर सुरुवातीला नांदुरा पोलिस ठाण्यात अपघाती नोंद करण्यात आली होती. मात्र, जखमीचा जबाब आणि वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिस हेड कॉन्स्टेबल संदीप सोळंके यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून नांदुरा पोलीस पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!