चिखली (बुलढाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेतील दोन वर्गखोल्या गेल्या जवळपास दोन वर्षांपासून अत्यंत जीर्ण अवस्थेत असून त्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
शाळेतील जीर्ण छताचा एक तुकडा कोसळून एका विद्यार्थ्याला किरकोळ दुखापत झाल्याची घटना नुकतीच घडली. जखमी विद्यार्थ्याला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, यापुढे अशी घटना घडू नये, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही सुमारे दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती. त्यावेळी एका विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली होती आणि उपचारासाठी सुमारे ७० हजार रुपयांचा खर्च झाला होता. त्यानंतरही शाळेच्या दुरुस्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, शाळेची तातडीने दुरुस्ती करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी. अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर विद्यार्थी व पालकांसह शाळा भरवणार जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे..
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात शाळेतील शिक्षकांबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, “शिक्षक आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. मात्र, इमारतीच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे,” असे त्यांनी सांगितले आहे.














