Advertisement Advertisement

श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आलेली १८ वर्षीय तरुणी मंदिर परिसरातून बेपत्ता; शेगाव शहरात खळबळ…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): संग्रामपूर तालुक्यातील १८ वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबासह शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी आली असताना अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली असून शेगाव शहर पोलिसांनी बेपत्ता तरुणीचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संग्रामपूर तालुक्यातील संबंधित तरुणी आपल्या आई-वडील व बहिणीसोबत श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव येथे आली होती. दर्शनानंतर तिची बहीण बाथरूमला गेली असताना ही तरुणी मंदिर परिसरात थांबली होती. काही वेळाने बहीण परत आल्यानंतर ती तेथे दिसून आली नाही.

यानंतर कुटुंबीयांनी मंदिर परिसर, बसस्थानक, रेल्वे स्टेशन तसेच शहरातील विविध ठिकाणी तिचा शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी शेगाव शहर पोलीस ठाणे गाठून तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी बेपत्ता असल्याची नोंद करून तरुणीचा शोध सुरू केला आहे. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच इतर माध्यमांतून तिचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, संबंधित तरुणीबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास अथवा ती आढळून आल्यास तातडीने शेगाव शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!