देऊळगाव राजा (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : देऊळगाव राजा येथील शासकीय विश्रामगृहात १ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत पीडित रूपाली प्रशांत जैन यांनी केतन पद्मकुमार गिरणीवाले यांच्यावर गंभीर आरोप करत न्यायाची मागणी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना रूपाली जैन यांनी सांगितले की, आरोपीने अनेक वर्षे प्रेमसंबंध ठेवत लग्नाचे आश्वासन दिले. दोघांचा साखरपुडाही झाला होता. तसेच विविध धार्मिक, सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आरोपीने त्यांचा पत्नी म्हणून परिचय करून दिल्याने विवाह निश्चित असल्याचा आपला पूर्ण विश्वास बसला होता. आरोपीच्या घरातील वास्तुशांती कार्यक्रमातही आपण सहभागी झालो होतो. यासंदर्भातील साखरपुडा आणि विविध कार्यक्रमांची छायाचित्रे त्यांनी माध्यम प्रतिनिधींना दाखविली.
या विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने वारंवार शारीरिक शोषण केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यानंतर आरोपीने दुसऱ्या महिलेशी विवाह केल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याबद्दल त्यांनी पोलिस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.
आरोपीला तातडीने अटक करून कायदेशीर कारवाई करावी आणि पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी रूपाली जैन यांनी पत्रकार परिषदेत केली.













