चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आयुर्वेद वाचस्पती डॉ. पंढरी उत्तमराव इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त, गंगाई हॉस्पिटलच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त तसेच राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त आयोजित आरोग्य सप्ताहाच्या चौथ्या दिवशी भव्य मोफत आयुर्वेदिक रोगनिदान व उपचार शिबिराच्या पहिल्या दिवसाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. गंगाई आरोग्यधाम, मेहकर फाटा, जालना रोड, चिखली येथे आयोजित या शिबिरासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून आलेल्या शेकडो रुग्णांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आयुर्वेदावरील विश्वास अधिक दृढ केला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन आणि सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी सामूहिक प्रार्थना करून करण्यात आली. त्यानंतर आयुर्वेद वाचस्पती डॉ. पंढरी उत्तमराव इंगळे यांनी शिबिराचे उद्घाटन केले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याचे संपूर्ण विज्ञान आहे. योग्य आहार, विहार, योग, पंचकर्म आणि शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचारांच्या माध्यमातून अनेक जुनाट आजारांवर प्रभावी उपचार शक्य आहेत.”
या भव्य शिबिरामध्ये एव्हीएन (Avascular Necrosis), कंबरदुखी, मानदुखी, मणक्याचे विविध विकार, स्लिप डिस्क, सायटिका, गुडघेदुखी, सांधेदुखी, संधिवात, पक्षाघात, पोटाचे विविध विकार, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, वातविकार तसेच इतर दीर्घकालीन आजारांवरील तज्ज्ञ तपासणी, आयुर्वेदिक मार्गदर्शन व उपचार करण्यात आले. प्रत्येक रुग्णाची सखोल तपासणी करून त्यांच्या प्रकृतीनुसार वैयक्तिक उपचार योजना, पंचकर्म उपचार, योग, आहार-विहार मार्गदर्शन आणि आवश्यक औषधोपचार देण्यात आले.
शिबिरासाठी बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अकोला, वाशीम, अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ यांसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून तसेच राज्याबाहेरील अनेक रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सकाळपासूनच गंगाई आरोग्यधाम परिसरात रुग्णांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
श्री. विद्याधरजी महाले यांची सदिच्छा भेट…
या शिबिराचे प्रमुख आकर्षण म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक, विद्याधरजी महाले यांनी आपल्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून गंगाई आरोग्यधाम येथे सदिच्छा भेट दिली.
श्री. महाले यांनी संपूर्ण शिबिराची पाहणी करून विविध उपचार विभागांना भेट दिली. त्यांनी महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या रुग्णांशी आत्मीयतेने संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अनेक रुग्णांनी आयुर्वेदिक उपचारांमुळे झालेल्या सकारात्मक बदलांचे अनुभव विद्याधरजी महाले यांच्यासमोर व्यक्त केले.
यानंत श्री. विद्याधरजी महाले यांनी आयुर्वेद वाचस्पती डॉ. पंढरी उत्तमराव इंगळे यांच्याकडून गंगाई हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या एव्हीएनवरील संशोधनाधारित उपचारपद्धती, आयुर्वेदिक पंचकर्म, न्युरोथेरपी, मणक्याचे विकार, मोफत आरोग्य शिबिरे, औषधी वनस्पती संवर्धन अभियान आणि समाजोपयोगी आरोग्य उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली.
महाले यांनी गंगाई हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रामीण व सर्वसामान्य नागरिकांसाठी गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेल्या निस्वार्थ रुग्णसेवेचे विशेष कौतुक केले. आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार, ग्रामीण भागात सातत्याने आयोजित करण्यात येणारी मोफत आरोग्य शिबिरे, औषधी वनस्पती संवर्धन, आरोग्य जनजागृती आणि समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे अभिनंदन करून त्यांनी डॉ. पंढरी उत्तमराव इंगळे यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी युवा सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक राणा सोमेशजी इंगळे, भाजपा नेते श्री. गजाननभाऊ परिहार, भाजपा कार्यकर्ते श्री. अमोल तायडे, तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी गंगाई आरोग्यधामच्या माध्यमातून ग्रामीण भागात सुरू असलेल्या आयुर्वेद प्रचार-प्रसार, रुग्णसेवा आणि समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले.
समारोपाच्या वेळी आयुर्वेद वाचस्पती डॉ. पंढरी उत्तमराव इंगळे यांनी श्री. विद्याधरजी महाले, उपस्थित सर्व मान्यवर, रुग्ण आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “आयुर्वेद हा केवळ आजारांवरील उपचार नसून निरोगी, आनंदी आणि दीर्घायुषी जीवन जगण्याचा वैज्ञानिक मार्ग आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत आयुर्वेद पोहोचवून समाज निरोगी करणे हेच आमचे ध्येय आहे.”
यावेळी त्यांनी अधिकाधिक नागरिकांनी या भव्य मोफत आयुर्वेदिक रोगनिदान व उपचार शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. आरोग्य सप्ताहांतर्गत पुढील दिवसांमध्येही विविध आरोग्यविषयक उपक्रम, मोफत तपासणी, आयुर्वेदिक मार्गदर्शन, पंचकर्म सल्ला आणि उपचार सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.















