Advertisement Advertisement

बुलढाणा शहरात पुन्हा अस्वलाची एन्ट्री! तासभर झाडावर मुक्काम; वनविभागाने जंगलात हुसकावले….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील खालिद बिन वलीद नगर परिसरात रविवारी (२८ जून) रात्री ९ वाजेच्या सुमारास अस्वल शिरल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. काही नागरिकांनी अस्वल पाहताच वनविभागाला माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या रेस्क्यू पथकाने तातडीने शोधमोहीम राबवून अखेर अस्वलाला सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने हुसकावून लावले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा शहरातील क्रीडा संकुल, महाडा कॉलनी, बालाजी नगर, खालिद बिन वलीद नगर आणि मिर्झा नगर हे परिसर अजिंठा पर्वतरांगेच्या काठावर असल्याने येथे अस्वल, बिबट्या व तडस यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर अधूनमधून दिसून येतो. रविवारी रात्री खालिद बिन वलीद नगरमध्ये अस्वल मुक्तसंचार करत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली.

वनविभागाचे अधिकारी जमीर शेख यांच्या सूचनेनुसार रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत अस्वल नजरेआड झाले होते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने वनपाल पी. आर. मोरे, संदीप मडावी, अमोल चौहान आणि पवन वाघ यांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. काही वेळाने अस्वल एका घराजवळून जाताना दिसताच नागरिकांची चाहूल लागल्याने ते धावत जाऊन एका उंच झाडावर चढले. जवळपास तासभर अस्वल झाडावरच थांबून राहिल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

रेस्क्यू पथकाने नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर अस्वल झाडावरून खाली उतरल्यावर वनकर्मचाऱ्यांनी दक्षता घेत त्याला कोणतीही इजा न होता जंगलाच्या दिशेने हुसकावून लावले.

आठवडाभरापासून अस्वलाचा मुक्तसंचार; नागरिकांमध्ये भीती

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मागील आठवडाभरापासून दररोज रात्री ८ वाजेच्या सुमारास अस्वल खालिद बिन वलीद नगर परिसरात फिरताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून वनविभागाने नागरी वस्तीला लागून असलेल्या डोंगर परिसरात उंच तार फेन्सिंग उभारावे, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!