बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, नव्याने सुरू करण्यात आलेल्या व श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांसाठी नियमित पदनिर्मितीस मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा लाभ बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर ट्रॉमा केअर सेंटर, चिखली उपजिल्हा रुग्णालय, साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालय तसेच मोताळा तालुक्यातील कोथळी प्राथमिक आरोग्य केंद्राला होणार आहे. या निर्णयामुळे आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्याबरोबरच आगामी काळात मोठ्या प्रमाणात नियमित पदभरतीचा मार्गही मोकळा झाला आहे.
राज्य शासनाने २४ जून रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार, ५० टक्क्यांपेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नव्या व श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांसाठी आवश्यक पदनिर्मितीस मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पुणे, नंदुरबार, अहिल्यानगर आणि सिंधुदुर्ग येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या ३० खाटांच्या आयुष रुग्णालयांमधील नियमित पदांनाही मान्यता देण्यात आली आहे.
केंद्रीय आयुष तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या पदनिर्मितीसाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा शासन निर्णय निर्गमित झाला असून, त्याचा लाभ राज्यातील तसेच बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना होणार आहे.
या निर्णयामुळे मेहकर, चिखली, साखरखेर्डा आणि कोथळी येथील आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळणार असून, आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात नियमित पदभरती होणार असल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होणार आहेत.













