मेरा बु.(बुलडाणा कव्हरेज न्युज): दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता नकार दिल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीवर दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना पाडळी शिंदे येथे घडली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादीच्या घरी जाऊन त्याच्या आईला काठीने मारहाण केली, पत्नीला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार, पाडळी शिंदे येथील गौतम दणीकर जाधव (वय ४५) हे मजूर आणण्यासाठी जात असताना गावातील राजरत्न जालिंदर जाधव याने त्यांना अडवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, “माझ्याकडे पैसे नाहीत,” असे सांगताच आरोपीने संतापून रस्त्यावरील दगड उचलून त्यांच्या डोळ्याजवळ मारला. या हल्ल्यात गौतम जाधव गंभीर जखमी झाले.
यानंतर आरोपी फिर्यादीच्या घरी गेले. तेथे त्यांनी फिर्यादीच्या आई व पत्नीला शिवीगाळ केली. फिर्यादीच्या आईच्या हातावर काठीने मारहाण करून तिला जखमी केले, तर पत्नीला अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात राजरत्न जालिंदर जाधव, जालिंदर दशरथ जाधव, आशा जालिंदर जाधव आणि विश्वपाल जालिंदर जाधव यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.













