दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : राहेरी बुद्रुक येथील ऐतिहासिक व नव्या पुलाच्या डागडुजी आणि साफसफाईच्या कामादरम्यान सुरक्षेच्या नावाखाली समोर आलेल्या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. काम सुरू असल्याची सूचना देण्यासाठी चौरसिया कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कामगारांनी सुरक्षा कोन, बॅरिकेड्स किंवा चेतावणी फलकाऐवजी रस्त्यावर चक्क रिकाम्या बिअरच्या बाटल्या उभ्या करून वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
पुलावरून सतत वाहनांची ये-जा सुरू असताना अशा प्रकारची निष्काळजी व्यवस्था केल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडाला. एखादा गंभीर अपघात घडला असता त्याची जबाबदारी कोणाची, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर राहेरी बुद्रुक येथील ऐतिहासिक पुलावरून जड वाहतुकीस बंदी घालण्यात आली होती. मात्र पर्यायी मार्गावरील मोठमोठे खड्डे, उंच गतिरोधक आणि खराब रस्त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. महामंडळाच्या बसही अनेकदा रस्त्यावर घासत असल्याने नुकसान झाले, तर लहान वाहनांनाही मार्गक्रमण करणे अवघड झाले होते. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी मेहकर–चिखली–देऊळगाव राजा–जालना असा लांबचा पर्यायी मार्ग स्वीकारला होता.
नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर अखेर पुलाच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले. हे काम पुलगाव येथील चौरसिया कन्स्ट्रक्शन कंपनीकडे देण्यात आले आहे. मात्र काम सुरू असताना आवश्यक सुरक्षा साधनसामग्रीच उपलब्ध नसल्याने कामगारांचा जीवही धोक्यात आल्याचे चित्र आहे.
पोलीस पाटलांनी विचारला जाब….
सोयंदेव येथील पोलीस पाटील दीपक कायंदे हे घटनास्थळावरून जात असताना त्यांनी कामगारांना सुरक्षा व्यवस्थेबाबत विचारणा केली. त्यावेळी कामगारांनी घाईघाईने रस्त्यावर ठेवलेल्या बिअरच्या बाटल्या बाजूला हटवल्या. त्यानंतर कायंदे यांनी संबंधित सुपरवायझर तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता रोहित राऊत यांच्याशी संपर्क साधून, “पुलावर काम सुरू आहे; पण सुरक्षेसाठी बिअरच्या बाटल्या ठेवणे हा निष्काळजीपणा की व्यवस्थेचा बोजवारा?” असा जाब विचारला.
तसेच संबंधित कंत्राटदारावर तातडीने कारवाई करून कामगारांना आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून द्यावे, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, विकासकामांसोबत सुरक्षेलाही तितकेच महत्त्व दिले जावे आणि संबंधित विभागाने या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.














