डोणगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक व्यापाऱ्यांनी परवाने काढणे, नूतनीकरण करणे, स्वच्छतेकडे लक्ष देणे आणि नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पसरलेल्या अफवांमुळे डोणगावसह परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवारी (१५ जून) डोणगावातील अनेक हॉटेल, किराणा दुकाने, भेळ भंडार, दूध डेअरी आणि इतर खाद्य व्यवसाय दिवसभर बंद ठेवण्यात आले. “साहेब आले”, “आता धाड पडणार”, “या भागात कारवाई सुरू आहे” अशा अफवा सकाळपासून गावभर पसरल्याने अनेकांनी खबरदारी म्हणून दुकाने बंद ठेवली.
मुंढे यांच्या कार्यपद्धतीमुळे खुले पनीर, खुले खाद्यतेल, गुटखा विक्री तसेच अस्वच्छ दुकाने यांच्यावर नियंत्रण येण्यास सुरुवात झाली आहे. अनेक व्यापाऱ्यांनी वर्षानुवर्षे न झालेली साफसफाई केली असून, वृत्तपत्र किंवा रद्दी कागदात खाद्यपदार्थ देण्याची पद्धतही बंद करण्यास सुरुवात केली आहे. त्याऐवजी प्लेट्स किंवा पत्रावळींचा वापर वाढला आहे.
दरम्यान, गुटखा विक्रेत्यांमध्येही धास्ती निर्माण झाली असून अनेक पानटपऱ्या दिवसा बंद ठेवून रात्री व्यवसाय करत असल्याचे चित्र आहे. अफवांचा फायदा घेत काही होलसेल विक्रेते गुटख्याचे दर वाढवत असल्याचीही चर्चा आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप पाटील यांनी स्पष्ट केले की, “आमचे पथक सध्या देऊळगाव राजा येथे असून मेहकर किंवा डोणगाव परिसरात कोणतीही कारवाई सुरू नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये. तोतया अधिकारी बनून फसवणूक होण्याची शक्यता असल्याने व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करून व्यवसाय सुरू ठेवावा.”
अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी आवश्यक असली तरी अफवांमुळे बाजारपेठ ठप्प होणे ही चिंतेची बाब ठरत असून, प्रशासनानेही याबाबत जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.












