Advertisement Advertisement

“व्हॉट्सॲपवरचा मेसेज उघडला,”APK फाईलच्या नादात पोस्ट कर्मचाऱ्याला लाखोंचा फटका”…

मलकापूर (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : व्हॉट्सॲपवर आलेली एक फाईल उघडणे मलकापूर येथील पोस्ट कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले. अज्ञात सायबर भामट्यांनी मोबाईल हॅक करून क्रेडिट कार्डचा गैरवापर करत तब्बल ३ लाख ८० हजार २४१ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुलढाणा सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण प्रकाश तायडे (वय ३९), रा. मधुबन नगर, मलकापूर हे शेगाव येथील पोस्ट कार्यालयात कार्यरत आहेत. ७ जून रोजी सायंकाळी ७ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या व्हॉट्सॲपवर एका अज्ञात क्रमांकावरून “M PARIVAHAN APK” नावाची फाईल पाठविण्यात आली होती.

तायडे यांनी ती फाईल उघडताच सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळवला. त्यानंतर त्यांच्या खात्याशी संलग्न असलेल्या क्रेडिट कार्डची माहिती आणि अॅक्सेस वापरून विविध ऑनलाइन व्यवहार करण्यात आले. काही वेळातच त्यांच्या खात्यातून ३ लाख ८० हजार २४१ रुपये परस्पर वळते करण्यात आल्याचे समोर आले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाणे, बुलढाणा येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(सी) व ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संग्राम पाटील करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!