चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरालगतच्या बुलढाणा रोडवरील दांडगे पेट्रोल पंपाजवळ सोमवारी (दि. १ जून) रात्री सुमारे ७.३० वाजेच्या सुमारास मोटारसायकल व वॅगनार कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखली शहरातील राऊतवाडी परिसरातील रहिवासी अक्षय कुलसुंदर व गोलू गवारे हे दोघे मोटारसायकल क्रमांक एमएच-२८ बीएक्स-२७८६ वरून बुलढाण्याकडून चिखलीकडे येत होते. दरम्यान, दांडगे पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या मोटारसायकलची वॅगनार कार क्रमांक एमएच-४९ बीबी-६३४६ सोबत जोरदार धडक झाली.
धडक इतकी भीषण होती की मोटारसायकलचे अनेक भाग तुटून रस्त्यावर विखुरले गेले. या अपघातात अक्षय कुलसुंदर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गोलू गवारे हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील जे.जे. प्लस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे. तसेच या प्रकरणी कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या दुर्दैवी घटनेमुळे राऊतवाडी परिसरासह संपूर्ण चिखली शहरात हळहळ व्यक्त होत असून कुलसुंदर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.













