खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): खामगाव तालुक्यातील एका गावात१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर खामगाव ग्रामीण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चार आरोपींना अटक केली असून त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ९ मे ते २४ मे दरम्यान खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने तसेच प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन तिची ओळख आणि गावाचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.
या प्रकरणी अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथील किसना उर्फ सुमित सुभाष मुंडे (२०), दादू कुलदीप कवडकार (२०, रा. कदमापूर, ता. खामगाव), अजय उर्फ सुदर्शन श्रीकृष्ण बघे (२०, रा. कदमापूर) तसेच एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. आरोपींनी अत्याचार केल्यानंतर त्याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप आहे.
पीडित मुलीने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी व्हायरल व्हिडिओसह इतर डिजिटल पुरावे जप्त केले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे…













