Advertisement Advertisement

भरधाव मालवाहूची दुचाकीला धडक; एक ठार, एक गंभीर जखमी…

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर-मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर पोलीस ठाणे हद्दीतील पिंपरी सरहद्द परिसरात भरधाव मालवाहू पिकअप आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना बुधवारी (दि. २० मे) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून काही काळ महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती.

या अपघातात राधेश्याम वामन इंगळे (वय ४२, रा. तिवळी, ता. मालेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. तर संतोष शिंदे (वय ४०, रा. तिवळी) हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राधेश्याम इंगळे आणि संतोष शिंदे हे मेहकर तालुक्यातील नागापूर येथे लग्न समारंभासाठी गेले होते. समारंभ आटोपून ते दुचाकी क्रमांक एमएच ३७ यू ७०३१ ने आपल्या गावी परतत असताना पिंपरी सरहद्द परिसरात समोरून भरधाव येणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की राधेश्याम इंगळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर संतोष शिंदे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर पिकअप चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती असून शिरपूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र अर्धा ते पाऊण तास उलटूनही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. अखेर केनवड प्राथमिक आरोग्य केंद्राची १०२ रुग्णवाहिका घटनास्थळी बोलावण्यात आली. रुग्णवाहिकेचे चालक तोफिक मिर्झा यांनी तत्काळ धाव घेत जखमी संतोष शिंदे यांना उपचारासाठी वाशिम येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून फरार पिकअप चालकाचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!