खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील अटाळी येथून एक महिला व तिची दोन लहान मुले बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश वसंता सोनाग्रे (वय ३३, रा. अटाळी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची पत्नी सौ. शारदा योगेश सोनाग्रे (वय ३०), मुलगा प्रेम (वय १४) आणि मुलगी परी (वय ४) हे तिघेही ३ मे रोजी सायंकाळी सुमारे ४.३० वाजताच्या सुमारास घरातून बाहेर पडले. मात्र त्यानंतर ते परत न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, तरीही त्यांचा काहीही ठावठिकाणा लागला नाही.
घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी हरवल्याची नोंद करून शोधमोहीम सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ बाळकृष्ण फुंडकर करीत आहेत.
दरम्यान, संबंधित महिला व मुलांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.













