सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): भरधाव वेगातील दुचाकीचा मालवाहू वाहनावर धडक झाल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ३० एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील दुसरबीड फाट्याजवळील वळणावर घडली.
या अपघातात रोशन नांदूरकर (वय २९) याचा जागीच मृत्यू झाला, तर शुभम पांडुरंग वंजाळे (वय २८) याचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. दोघेही अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही पुणे येथून बीबी येथे लग्नसमारंभासाठी आले होते. लग्न सोहळा आटोपल्यानंतर ते दुचाकीने आपल्या गावी अंजनगाव सुर्जी येथे परत निघाले होते. दरम्यान, सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा गावाजवळील धोकादायक वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांच्या एमएच-२८-बीएच-६२७६ क्रमांकाच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनावर जोरदार धडक झाली.
या भीषण अपघातात दोघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.














