मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जुना वाद चांगलाच विकोपाला गेल्याने एका व्यक्तीने थेट थार गाडीने चार जणांना उडवून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मलकापूर तालुक्यातील कोकलवाडी येथे घडली. या घटनेत चारही जण जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरखेड येथील रहिवासी इंद्रसिंह रामलालसिंह राजपूत (वय ४९) हे शेती व गिट्टी खदान व्यवसाय करतात. त्यांचा कोकवाडी येथील रामेश्वर दादाराव भगत याच्याशी जुन्या वादातून संघर्ष सुरू होता. दरम्यान, २८ एप्रिल रोजी सकाळी सुमारे १० वाजता इंद्रसिंह राजपूत हे कोकलवाडी येथे नातेवाइकांच्या तेरवीच्या कार्यक्रमासाठी गेले होते.
हनुमान मंदिरासमोर ते नातेवाइक अनिलसिंह, प्रतापसिंह, आतिषसिंह व रामसिंह राजपूत यांच्याशी बोलत उभे असताना आरोपी रामेश्वर भगत हा एमएच-५६-ए-८१११ क्रमांकाच्या महिंद्रा थार गाडीने भरधाव वेगात आला आणि सर्वांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत चौघेही दूर फेकले गेले.
इंद्रसिंह राजपूत हे हातपंपाजवळ पडले असताना आरोपीने पुन्हा गाडी त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, मध्ये हातपंप आल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
या घटनेत इंद्रसिंह राजपूत यांना कमरेला, उजव्या हाताला व डोक्याला मार लागला आहे. तर रामसिंह, आतिष व प्रतापसिंह राजपूत हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी इंद्रसिंह राजपूत यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी आरोपी रामेश्वर भगत याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय पवार करीत आहेत.











