Advertisement Advertisement

परतीच्या प्रवासात भीषण कार अपघात : खैरव येथील तिघा युवकांचा दुर्दैवी मृत्यू

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) नाशिक जिल्ह्यातील सिन्नर एमआयडीसी परिसरात २५ एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या भीषण कार अपघातात बुलडाणा जिल्ह्यातील खैरव येथील तिघा युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे खैरव गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खैरव येथील वैभव रामदास शिंदे यांच्या मालकीच्या जेसीबीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी वैभव शिंदे, चालक श्रीकिसन हनुमान सुरुशे (रा. पाटोदा) आणि संकेत प्रकाश खोसे (रा. खैरव) हे तिघे सियाज कारने सिन्नर येथे गेले होते. काम पूर्ण करून परतीच्या प्रवासात असताना सिन्नर एमआयडीसीजवळ त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला.

अपघात इतका भीषण होता की संकेत प्रकाश खोसे आणि श्रीकिसन हनुमान सुरुशे यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या वैभव रामदास शिंदे यांना तातडीने नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली. त्यामुळे या दुर्घटनेत तिघांचाही मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच खैरव गावचे सरपंच गजानन शिंदे यांच्यासह नातेवाईकांनी तातडीने सिन्नरकडे धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत मृतदेहांवर शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होती. या दुर्घटनेमुळे खैरव गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, एकाचवेळी तिघा युवकांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!