चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) – जिल्ह्यासह चिखली तालुक्यातील रेशनकार्डधारकांसाठी एप्रिल महिन्यात प्रत्येकी ३ लिटर केरोसीन (रॉकेल) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना चूल पेटवण्यासाठी हा दिलासा मिळणार आहे.
मात्र, या निर्णयासोबत काही अडचणीही समोर येत आहेत. जिल्ह्यात केवळ नांदुरा येथेच एक होलसेल डीलर असून किरकोळ विक्रेत्यांना त्यांच्याकडूनच केरोसीन उचल करणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे, किरकोळ विक्रेत्यांना पोच डिलिव्हरी दिली जाणार नसल्याने त्यांना स्वतः जाऊन केरोसीन आणावे लागणार आहे.
चिखली तालुक्यात केरोसीन पंप नसल्याने घाऊक डीलरकडून मोजमाप करून केरोसीन देताना अनेक वेळा मापात तफावत येण्याची शक्यता आहे. यामुळे कमी माप मिळाल्यास त्याचा थेट आर्थिक फटका दुकानदारांना बसणार आहे.
दरम्यान, शासनाने ६५ रुपये प्रति लिटर दराने प्रत्येक कार्डधारकाला ३ लिटर केरोसीन देण्याचे निश्चित केले आहे. मात्र, दुकानदारांना प्रति लिटर केवळ १.३५ रुपये इतकेच कमिशन मिळणार आहे. एका दुकानदाराला साधारण ३०० लिटर कोटा मिळत असून त्यातून सुमारे ४०० रुपयांपर्यंतच नफा मिळण्याची शक्यता आहे.
पुरवठा विभागाकडूनही सूचना देण्यात आल्या आहेत की, किरकोळ केरोसीन धारकांनी एक लिटरही कमी उचल करू नये. जर माप कमी मिळत असेल, तर त्याच ठिकाणी केरोसीन न स्वीकारता त्वरित पुरवठा निरीक्षक प्रियंका सोनतुसडे यांच्याशी संपर्क साधावा. पुढील शासनाच्या सूचना दुकानदारांपर्यंत पोहोचवल्या जातील, अशी माहिती जिल्हा पुरवठा निरीक्षक बी.जे. वार यांनी दिली.
दरम्यान, टाक्या आणणे, वाहतूक खर्च, मोजमापातील तफावत आणि ग्राहकांची समजूत काढणे अशा विविध कारणांमुळे केरोसीन विक्रेत्यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र आहे.














