बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभागाने मोठी कारवाई करत जिल्ह्यातील आठ कृषी सेवा केंद्रांचे रासायनिक खत विक्री परवाने निलंबित केले आहेत. तर दोन कृषी केंद्र संचालकांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा परवाना अधिकारी संतोष डाबरे यांनी ही कारवाई केली.
जिल्ह्यातील काही कृषी सेवा केंद्रांकडून रासायनिक खत विक्रीत अनियमितता, नियमभंग आणि कृत्रिम खतटंचाई निर्माण करण्याचा प्रकार होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाल्यानंतर गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणीत गंभीर त्रुटी उघड झाल्याने संबंधित केंद्रांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
तपासणीदरम्यान ई-पॉस मशीनवर शेतकऱ्यांची नोंद न करता खत विक्री, पक्के बिल न देणे, साठा पुस्तके अद्ययावत न ठेवणे, देयकावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नसणे अशा अनेक अनियमितता आढळून आल्या. या पार्श्वभूमीवर खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत संबंधितांवर कारवाई करण्यात आली.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना खताची टंचाई भासू नये, यासाठी प्रशासनाने नियोजन केले असून नियम डावलणाऱ्या विक्रेत्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा इशारा कृषी अधीक्षक संतोष डाबरे यांनी दिला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व परवानाधारक खत विक्रेत्यांनी नियमानुसारच रासायनिक खत विक्री करावी, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा कृषी विभागाने दिल्याने कृषी सेवा केंद्रांमध्ये खळबळ उडाली आहे.
















