डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): डोणगाव येथील शाळा व बसस्थानक परिसरात विद्यार्थीनींची छेडछाड, टवाळखोरी आणि भरधाव दुचाकी चालविण्याच्या प्रकारांत वाढ झाल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस विभागाच्या दामिनी महिला सुरक्षा पथकाने नियमित गस्त घालावी, अशी मागणी होत आहे.
डोणगाव येथे परिसरातील अनेक गावांमधून शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात. शाळा सुरू होण्याची व सुटण्याची वेळ ही बसस्थानक परिसरात मोठी गर्दी असते. याच वेळी काही टवाळखोर युवक दुचाकी घेऊन परिसरात थांबत असल्याचे तसेच भरधाव वेगाने वाहने चालवत विद्यार्थिनींवर टिप्पणी करणे, पाठलाग करणे आणि त्रास देण्याचे प्रकार घडत असल्याची तक्रार आहे.
विशेषतः पावसाळ्यात बसची प्रतीक्षा करताना ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना बसस्थानकावर बराच वेळ थांबावे लागते. याच संधीचा गैरफायदा घेत काही युवक मुलींना त्रास देत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मोठ्या आवाजात फटाके फोडणाऱ्या बुलेट दुचाकी आणि बेदरकार वाहनचालकांमुळे अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
डोणगावसह परिसरातील अनेक मुली शिक्षणासाठी मेहकर, चिखली, हिवरा आश्रम व सुलतानपूर येथे ये-जा करतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा आणि बसस्थानक परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी पोलीस प्रशासनाने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन दामिनी महिला सुरक्षा पथकाच्या नियमित गस्तीसह टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.












