मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): अल्पवयीन मुलांकडून काम करून घेत त्यांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण केल्याप्रकरणी मलकापूर शहरातील दोन आस्थापनांच्या मालकांविरुद्ध मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान तीन अल्पवयीन बालकामगारांची सुटका करण्यात आली.
दुकाने व संस्था विभागाचे निरीक्षक योगेश विलास गोटे (वय ३४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १५ जुलै रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर खाजा गरीब नवाज गॅरेज, मुक्ताईनगर रोड, मलकापूर तसेच मल्टी ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिस, शिवाजीनगर, मुक्ताईनगर रोड या आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान रियाजोद्दीन बुरानोद्दीन (वय १३, रा. कुरेशीनगर, पारपेठ), शेख शाहरूख शेख सलीम (वय १६, रा. मोमीनपुरा, पारपेठ) आणि रेहान खान सिकंदर खान (वय १६, रा. सायकलपुरा, मलकापूर) हे तीन अल्पवयीन मुलगे काम करताना आढळून आले. पंचासमक्ष झालेल्या तपासणीत संबंधित बालकांकडून प्रतिबंधित स्वरूपाचे काम करून घेत असल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारीनुसार, संबंधित आस्थापनांच्या मालकांनी अल्पवयीन मुलांना कामावर ठेवून त्यांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५२४/२०२६ आणि ५२५/२०२६ अन्वये बीएनएसएस कलम १४६ तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ मधील कलम ७५ व ७९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निंबोळकर करीत आहेत.












